ज्वालामुखी म्हणजे काय | Jwalamukhi Information in Marathi

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण माहिती करून घेणार आहोत कि, ज्वालामुखी म्हणजे काय ? Jwalamukhi Information in Marathi आपल्या सर्वांना माहिती आहे कि ज्वालामुखी म्हणजे काय आणि ते कसे दिसते, कारण आपण सर्वांनी कधीना कधी ज्वालामुखी विषयी कुठेनाकुठे तरी ऐकलेले आहे किंवा टीव्ही मध्ये पाहिलेले आहे किंवा वर्तमानपत्रात वाचलेले आहे.

परंतु ज्वालामुखी कसा तयार होतो त्यामागील काही शास्त्रीय कारणे आहेत काय? कोणत्या कारणामुळे ज्वालामुखी इतके विशाल रूप धारण करत असतो. ज्वालामुखीचे प्रकार किती व कोणते? ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे विषारी पदार्थ कोणकोणते असतात? अश्या बरेचश्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचल्यानंतर मिळेल.

ज्वालामुखी म्हणजे काय ? Jwalamukhi Information in Marathi

सर्वसामान्यपणे पृथ्वीच्या बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे ज्‍वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात, त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात.

पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.

ज्वालामुखीय उद्रेका बद्दल मूलभूत माहिती

हे जाणून घ्यायचे असेल तर आधी तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्यावे लागेल एक म्हणजे Plate Tectonic म्हणजे काय? आणि दुसरे म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील संरचना कशी असते?

Plate Tectonic म्हणजे काय?

मराठी मध्ये Plate Tectonic म्हणजे भूविवर्तनकी. Plate Tectonic theory (सिद्धांत) जर्मन हवामानशास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनर यांनी 1912 मध्ये जगासमोर ठेवलेली होती त्याला “Continental Drift” या नावाने ओळखले जाते.

त्यांच्या मताप्रमाणे भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्‌ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागावर हे तरंगत असतात. 7 मोठ्या आणि 8 लहान अश्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर Plates आहेत. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात जेथे या Plates भूपट्ट एकमेकांना आदळतात, एकमेकांपासून दूर सरकतात, एकदुसऱ्याच्या खाली जातात.

पृथ्वीचे अंतरंगाची संरचना

पृथ्वीच्या ज्या भूपृष्ठावर आपण उभे आहोत त्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या पोटातील (पृथ्वीच्या आतील) गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो. या दोन घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे १) भूकवच, २) प्रावरण, ३) गाभा अशा तीन भागात विभागणी करू शकतो.

1) भूकवच :

पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी १६ ते ४५ किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणींखाली ४० किमीपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती १० किमीपेक्षा कमी आढळते.

भू- खंडीय कवच : (साधी जमीन ज्यावर मानव राहतो)

भूखंड प्रामुख्याने सिलिका (सिलिका हे सिलिकॉन या मुलद्रव्याचे संयुग आहे.) व ॲल्युमिनिअम या पासून बनलेले आहेत. यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता २.६५ ते २.९० ग्रॅम/ घसेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे ३० किमी आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाईट खडक आढळतात.

महासागरीय कवच : (महासागरातील पाण्याखालील जमीन)

हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी ७ ते १० किमी आहे. महासागरीय कवचाची घनता २.९ ग्रॅम/घसेमी ते ३.३ ग्रॅम/घसेमी इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात.

2) प्रावरण :

भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात.

भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे ४२ किमी खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. या भागात २४०० ते २९०० किमी खोलीवरील तापमान २२००° से. ते २५००° से. पर्यंत असावे असे अनुमान आहे.

3) गाभा :

भूपृष्ठापासून सुमारे २९०० किमी खोलीच्या खाली ‘गाभ्याचा भाग’ सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. गाभ्याची जाडी ३४७१ किमी आहे. या थराचे बाह्यगाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात.

बाह्यगाभा :

बाह्यगाभा भूपृष्ठापासून सुमारे २९०० किमी ते ५१०० किमी खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यमलहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की, गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात. परंतु, त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता ९.८ ग्रॅम/घसेमी इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे ५०००° से. आहे.

पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

अंतर्गाभा :

अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे ५१५० किमीपासून ६३७१ किमी खोलीपर्यंत (पृथ्वीच्या केंद्रापर्यंत) आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे १३.३ ग्रॅम/घनसेमी इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्यामुळे त्यास निफे असेही म्हणत असत. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके असते.

ज्वालामुखी कसा तयार होतो? | ज्वालामुखीचे कारणे

तुम्हाला समजले असेल कि, Plate Tectonic आणि पृथ्वीची अंतर्गत संरचना कशी आहे ती, आता पाहुयात कि नेमकं ज्वालामुखी चा उद्रेक कसा होतो. ज्वालामुखीचे कारणे काय आहेत ते. भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्‌ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागावर हे तरंगत असतात. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालींमुळे ज्वालामुखी आणि भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एकदुसऱ्या खाली जाणे इत्‍यादी बाबी घडत असतात.

हे सुद्धा वाचा : –

जेव्हा या (Plates मध्ये) भूपट्टांमध्ये हालचाली होतात तेव्हा या Plates च्या सीमांजवळ त्या Plates मध्ये Cracks भेगा पडतात त्या जर प्रावरणापर्यंत असेल म्हणजेच प्रावरणापर्यंत थेट मार्गाद्वारे पोकळी तयार झाली कि त्या प्रावरणा मधून पृथ्वीच्या पृष्ठभागावर शिलारस येतो म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होतो.

जेव्हा हा शिलारस पृथ्वीच्या आत असतो त्याला मॅग्मा म्हणतात आणि जेव्हा हा शिलारस ज्वालामुखींद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच जमिनीवर मॅग्मा चेम्बर मधून येतो तेव्हा त्याला लाव्हारस म्हणतात. सर्वात जास्त समुद्रात ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. उदा. पॅसिफिक समुद्रातील : Pacific Ring Of Fire

सतत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हारस साचत राहिल्यामुळे त्याला Cone सारखे स्वरूप प्राप्त होते.

ज्वालामुखीचे प्रकार किती व कोणते?

ज्वालामुखीचे उद्रेकानुसार दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते
१) केंद्रीय उद्रेक, २) भेगीय उद्रेक.

ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखींचे वर्गीकरण करता येते.

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.

 • जागृत ज्वालामुखी

वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.

 • सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी

काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/ निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा., इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.

 • मृत ज्वालामुखी

ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा., टांझानियातील किलीमांजारो.

ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ :

ज्वालामुखीच्या उद्रेकामधून प्रामुख्याने तीन प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात, ते द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप स्वरूपात आढळतात.

1) द्रवरूप पदार्थ :

यामध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास ‘मॅग्मा’ असे म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो. त्यावेळी त्यास ‘‘लाव्हा’’ असे म्हणतात. या लाव्हारसात असणाऱ्या सिलीकाच्या प्रमाणानुसार त्याचे दोन प्रकार पडतात.

 • आम्ल लाव्हा : यामध्येसिलीकाचे प्रमाण जास्त असते त्याचा वितलन बिंदू उच्च असतो. तो घट्ट असतो. त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते.
 • अल्कली लाव्हा : यामध्येसिलीकाचे प्रमाण कमी असते. त्याचा वितलन बिंदू कमी असतो. तो पातळ असतो. त्यामुळे तो जास्त प्रवाही असतो.

2) घनरूप पदार्थ :

धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश होतो. ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात, त्यावेळी त्यास ‘‘ज्वालामुखीय धूळ’’ असे संबोधतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना ‘राख’ असे म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना ‘सकोणाश्म’ असे म्हणतात. काही वेळा लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्याअगोदर फेकला जातो त्यास ‘ज्वालामुखीय बॉम्ब’ असे म्हणतात.

3) वायुरूप पदार्थ :

उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास ‘‘फुलकोबी ढग’’ असे म्हणतात. यांमधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात.

ज्वालामुखीचे परिणाम

 • ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते.
 • महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात.
 • ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
 • ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते.
 • लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात.
 • ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
 • मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

1 thought on “ज्वालामुखी म्हणजे काय | Jwalamukhi Information in Marathi”

Leave a Comment